सातारा : सातारा शहरातील शाहूनगर तसेच सदरबझार या उपनगरांचा पाणीपुरवठा सतत विस्कळीत असतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. या दोन्ही उपनगरांना कास धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी त्याचा आराखडा सादर करा, असे आदेश सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने गेली सहा महिन्यांपासून शाहूनगर परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाच्या पंपिंग स्टेशनवरील लाईट जाण्यामुळे शाहूनगर परिसरातील चारभिंतीजवळील पाण्याच्या टाक्या भरत नव्हत्या, हे कारण प्राधिकरणकडून सांगितले जात होते.
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी खा. उदयनराजे यांच्या सूचनेनुसार ऑगस्ट महिन्यात जीवन प्राधिकरणला कास धरणाचे पाणी देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याबाबत जीवन प्राधिकरणाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नव्हते. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारा शहराची लोकसंख्या चार लाख झाली तरी कास धरणाचे पाणी सर्व शहर व हद्दवाढ भागामध्ये मिळू शकते. तसेच कासच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणला खर्चही कमी येऊ शकतो. यासाठीच उदयनराजे यांनी शाहूनगर व सदरबझार या भागांसाठी कास तलावाचे पाणी देण्यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सूचित केले होते. मात्र जीवन प्राधिकरणच्या चालढकलीमुळे कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते. जीवन प्राधिकरणकडून समन्वय नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणच्या अभियंत्यांची बैठक खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जलमंदिर पॅलेस येथे पार पडली.
एक्स्प्रेस फिडरवरुन लाईन देण्याचे व पंपिंग स्टेशनवर तत्काळ 200 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवून विजेची समस्या तत्काळ दूर करण्याची ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच शाहूनगर व सदरबझार या भागासाठी कास तलावाचे पाणी देण्याच्या बाबतीत विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी दोन महिन्यात विकास आराखडा सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे शाहूनगर व सदरबझार परिसरातील कासचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, सागर भोसले, प्राधिकरणाच्या एल. एम. गडकरी, देशमुख व नागरिक उपस्थित होते.