सातारा : गेली बरेच दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी व तारळी धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने पुर्णत: उघडीप दिली होती. मात्र, रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
पावसाचा जोर वाढला असल्याने कोयना धरणातून १५ हजार २९४ क्युसेक, धोम धरणातून २ हजार ६५२ क्युसेक, धोम बालकवडी धरणातून ३३३ क्युसेक, कण्हेर धरणातून १ हजार ७९४ क्युसेक, उरमोडी धरणाच्या सांडव्यातून १ हजार १०० क्युसेक व जलविद्यूत प्रकल्पातून ४५० क्युसेक, वीर धरणातून १५ हजार ११ क्युसेक, तारळी धरणातून १ हजार ५०७ क्युसेक तर मध्यम प्रकल्प असलेल्या नेर धरणातून ११० क्युसेक, आंधळी धरणातून १०० क्युसेक, मोरणा धरणातून ५९० क्युसेक, उत्तरमांड धरणातून ४८० क्युसेक, वांग मराठवाडी धरणातून ३६१ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, निरा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली.