प्रवीण शिंगटे
सातारा : सातार्यासह राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी टाहो सुरू असताना पाण्याची किंमत समजू लागली आहे. यासाठी भविष्यातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी सातारा जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींनी पावसाच्या प्रत्येक थेंबाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पावसाचे अनियमीत प्रमाण, भूजल पातळीत होणारी घट, वाढती पाण्याची मागणी यावर काम सुरू केले आहे. या ऑडिटमुळे गावागावात थेंब न थेंब पाण्याचा हिशेब ठेवला जाणार आहे.
‘जल ही जीवन है’ या एका वाक्यातच पाण्याचे किती महत्त्व आहे हे दिसून येतो. मात्र, हेच पाणी वाचवण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले नाही. फक्त ‘तहान लागली की आड खोदायची’ प्रमाणे तोकड्या उपाययोजना करण्यात आल्या. देशात नावलौकीक असणार्या सातार्याने याही विषयात आता पुढाकार घेतला आहे. दुष्काळाच्या संकटातून जलव्यवस्थापनाकडे जाण्याचा निर्णय जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींनी घेतला आहे. या ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचा ताळेबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी उपलब्ध पाण्याचे स्रोत किती आहेत? त्यातून किती पाणी उपलब्ध होते.
वर्षभरात पाण्याचा वापर किती होतो आणि भविष्यात किती पाण्याची गरज भासणार आहे. याचा या ताळेबंदात विचार केला जाणार आहे. या पाण्याच्या ऑडिटमुळे गावपातळीवर जलनियोजनाला चालना मिळणार आहे. केवळ पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यापेक्षा पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, यासाठीच हे ऑडिट केले जाणार आहे. ताळेबंदाच्या आधारे गावात पाण्याची कमतरता आहे की उपलब्ध पाण्यापेक्षा वापर कमी आहे, हे स्पष्ट होते. त्यानुसार पाणी अडवणे, पाणी जिरवणे, नालाबांध, वनराई बंधारे, शेततळी, गाळ काढणे, विहिरींचे पुनर्भरण आणि जलसंधारणाच्या उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.
ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या ताळेबंदाचा नियमित आढावा घेऊन पाण्याची बचत, पुनर्वापर आणि भूजल पुनर्भरण यावर भर दिल्यास गावांना पाणीसमृद्धीच्या दिशेने वाटचाल करता येणार आहे. पाण्याची उपलब्धता आणि गरज यांचा ताळमेळ साधल्यास शेतीचे नियोजन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे सुलभ होणार आहे.
पाण्याचा ताळेबंद म्हणजे काय?
पाण्याचा ताळेबंद म्हणजे एखाद्या गावातील पाण्याची उपलब्धता आणि पाण्याचा वापर यांची नोंद ठेवणे. गावात पडणारा पाऊस, विहिरी, बोअरवेल, तलाव, बंधारे, नद्या आणि इतर जलस्रोतांमधून उपलब्ध होणारे पाणी याचा आढावा घेतला जात आहे. गावातील पाण्याचे उत्पन्न आणि खर्च याचा हिशेब म्हणजे पाण्याचा ताळेबंद होय. यामुळे गावातील पाण्याची उपलब्धता, गरज आणि संभाव्य टंचाई यांचा अंदाज घेऊन योग्य नियोजन केले जाते.