सातारा

Satara News: युद्धाच्या झळीने पुन्हा पेटल्या चुली...!

गॅसटंचाईवर पर्याय : लाकूडफाट्याची जुळवाजुळव

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : इराण-इसायल युद्धामुळे देशात गॅसटंचाईचे सावट घोंघावत आहे. स्वयंपाकाचा गॅस साठा उपलब्ध असतानाही वितरण व साठेबाजीमुळे नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. ग्रामीण भागात मात्र गॅसटंचाई फाट्यावर बसवत लाकूड फाट्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. आधुनिक सोयी सुविधांच्या भाऊगर्दीत निमशहरींसह ग्रामीण भागात कालबाह्य झालेल्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.

आधुनिक जीवनशैलीमध्ये जुनी विटा मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या आरसीसी इमारतींनी घेतली. सारवलेल्या जमिनीऐवजी गुळगुळीत फरशी चमकू लागली. शहरीकरणाची छाप ग्रामीण भागातही पडू लागल्याने गावखेड्यातही सिमेंटच्या इमारती वाढू लागल्या. त्याचबरोबर सोयीसुविधांची भुरळ पडू लागल्याने ग्रामीण संस्कृतीची छाप कमी होऊ लागली आहे. जुनी व पारंपरिक स्वयंपाकघरांची जागा मॉडर्न किचनने घेतली. त्यामुळे घराचे घरपण जपणारी चूल कालबाह्य झाली. अनेक घरांतून चूल नाहीशीच झाल्याने नवीन पिढीला चूल कशी पेटवायची हेदेखील माहिती नाही.

परंतु जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजारही होऊ लागला आहे. बुकिंग होत नसल्याने साठेबाजांकडून गॅस सिलिंडरसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात आहे. नोकरदार वर्गाला याचा फारसा फरक पडणार नसला तरी शेतकरी वर्ग, मध्यमवर्गीयांना याचा चांगलाच फटका बसत आहे. परिणामी स्वयंपाक घराचे कामकाज व आर्थिक बजेट दोन्हीही कोलमडू लागले आहे. यावर पर्याय म्हणून चुलीचा वापर सुुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. चुलींसाठी लाकूड फाटा गोळा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

शेतकरी वर्गातून वाळलेल्या झाडाच्या फांद्या, उसाचे बुडके गोळा करून ठेवले जात आहेत. पशुपालकांकडून शेणाच्या गोवरी थापण्यात येत आहेत. त्याचाही चुलीच्या सरपणासाठी वापर केला जाणार आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर अडीच दिवसांमध्ये त्याचा पुरवठा केला जाईल. तसेच अफवांना बळी पडून, घाबरुन जावून गॅसचा साठा करु नका असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात येत आहे.

युद्ध आखातात पण झळ जगभरात...

इराण व इस्त्राईल या देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली असताना अमेरिकेसह सुमारे 20 देशांनी यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उडी घेतली आहे. त्यामुळे युध्दाचा भडका उडून त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. इराण व इस्त्राईल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधनसाठे असल्याने जगभरात इंधन पुरवठ्यावर परिणाम जाणवत आहे. हे युध्द आखातात सुरु असले तरी त्याची झळ जगभरातील देशांना बसत आहे. जिल्ह्यासह देशभरात गॅस टंचाईचे सावट हे त्याचेच पडसाद आहे.

वृक्षतोड व पर्यावरण हानीचा धोका...

चुलीच्या धुरामुळे आरोग्याला हानी पोहचत होती. धुरामुळे डोळ्यांचे व श्वसनाचे आजार बळावत असल्याने गरीब कुटुंबातील महिलांसाठी शासन गेली अनेक वर्षे उज्वला गॅस योजनेद्वारे कमी दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करत आहे. पण सध्याच्या स्थितीत गॅस सिलिंडरसाठी गर्दी वाढत असल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुलीचा वापर पुन्हा सुरु होत असल्याने उज्वला गॅस योजनेचा उद्देश फोल ठरणार आहे. चुलीच्या सरपणासाठी वृक्षतोड व पर्यावरण ऱ्हास होण्याचा धोका संभवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT