सातारा

Satara: वाईच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य

पाच दिवस कचरा गाडी न आल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग

पुढारी वृत्तसेवा

वाई : सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल असलेल्या ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाई-सुरूर मुख्य रस्त्यालगत यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सह्याद्रीनगर परिसरात सलग पाच दिवस कचरा संकलनाची घंटागाडी न आल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून वाई शहराच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.

वाई नगरपालिका प्रशासनाकडून कचरा स्वीकारला जात नसल्याने ग्रामपंचायतीसमोर दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या भूमिकेमुळे सह्याद्रीनगर परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाई एमआयडीसी परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यात आली असली तरी ती अद्याप कार्यान्वित नसल्याने लाखो रुपयांची यंत्रणा शोपीस ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. यशवंतनगर ग्रामपंचायतीने पालिकेचा कर भरुनही कचरा स्वीकारला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कचरा गाडीची प्रतीक्षा करत महिला रस्त्यावर उभ्या राहत असून परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कचरा उचलून विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक असतानाच काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचेही निदर्शनास येत आहे.

सह्याद्रीनगर परिसरालगतच्या कालव्यातही काही नागरिक कचरा टाकत असल्याने ही बाब अधिक गंभीर बनली आहे. सार्वजनिक स्वच्छता राखणे ही प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT