सातारा

Satara: सुरूर-पोलादपूर मार्गावर वाईकरांची ‘उंट की सवारी’

रखडलेल्या कामामुळे हाल : ठेकेदारावर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाई : सुरूर–पोलादपूर मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि व्यावसायिक यांचे प्रचंड हाल होत आहेत. ठिकठिकाणी चढ-उतार झालेला रस्‍ता, अपूर्ण नाल्‍यांची कामे, डांबरावर केलेले काँक्रिटीकरण याचा फटका सर्वसामान्‍यांना बसत आहे. येथून प्रवास करताना प्रवाशांना उंट की सवारीचा अनुभव येत आहे. पर्यायी मार्गाची व्‍यवस्‍थाच नसल्‍याने किसनवीर कॉलेजपासून घाटाच्‍या सुरुवातीपर्यंत सकाळ-सध्‍यांकाळी वाहनांच्‍या रांगा लागत आहे. तसेच पर्यटकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या मार्गावर जवळपास दररोज एखादा अपघात घडत असून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना खड्डे, धूळ आणि अर्धवट कामामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वाहनांचे सुटे भाग तुटणे, टायर खराब होणे आणि यांत्रिक बिघाड हे ठरलेलेच आहे. सिमेंट काँक्रीट रस्ता तयार होत असताना आवश्यक त्या प्रमाणात क्‍युरिंग न केल्‍याने रस्‍त्‍याचे कामच निकृष्‍ट दर्जाचे होत आहे. त्‍यामुळे रस्‍त्‍याच्‍या दर्जाची तपासणी नेमकं करतंय तरी कोण? असा सवाल होत आहे.

किसनवीर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवासही धोकादायक बनला आहे. रस्त्यालगत अनेक ठिकाणी पदपथच नसल्याने विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि पर्यटकांचा घटलेला ओढा यामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. वाई–पाचगणी परिसरात येणारे पर्यटकही या मार्गावरील गैरसोयीमुळे पर्यायी मार्गांचा वापर करू लागले आहेत.

रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. श्वसनाचे विकार, ॲलर्जी आणि इतर आजारांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पदपथ नसल्यामुळे गटारांमध्ये पाय घसरून अनेकजण जखमी झाले आहेत.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे ठेकेदार मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून गुणवत्ता तपासणी करण्‍याची गरज आहे. आणखी किती अपघात, किती जखमी आणि किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा संतप्त सवाल केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT