सातारा : जिल्ह्यात विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेनंतर नोव्हेंबर महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या १ हजार १३ ग्रामपंचायत निवडणुकीत नवमतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. एसआयआर अंतर्गत लाखो मतदारांची नावे कमी झाल्याने मुदत संपण्यापूर्वी राजकीय पक्ष व नेत्यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी केल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.
विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत ३० जून ते १७ ऑगस्टदरम्यान घराघरांत जाऊन मतदार पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ ते ३० सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत. अंतिम मतदार यादी नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नवमतदार, विशेषत: १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी मतदार नोंदणी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास केवळ जुनी मतदार यादी आहे म्हणून आगामी निवडणुकीत मतदान करता येईल, असे गृहित धरता येणार नाही.
नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक दावा किंवा दुरुस्तीची प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादीकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सुमारे १ हजार १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने मोठ्या संख्येने ग्रामीण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा विचार करता जवळपास ६६ टक्के म्हणजे १ हजार १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे मतदार यादीतील नावाची खात्री करणे, ही नागरिकांसाठी महत्त्वाची बाब आहे.
महाविद्यालयांत मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन
जिल्हा प्राशसनाकडून महाविद्यालयीन मतदार नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादीत नाव आहे का, याची तपासणी करूनच पुढील निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. एसआयआर प्रारूप यादीत नाव नसले, तरी दावे-हरकतींची प्रक्रिया आणि त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यावरच अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे; मात्र मतदारांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.