सातारा : माऊली माऊली रूप तुझे, विठ्ठल नामाच्या गजरात जिल्ह्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल भक्तांमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्व असल्याने रविवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहिली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याने लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तुळशीपत्र व पूजा साहित्याची दुकाने, भाविकांची गर्दी यामुळे मंदिर परिसरांना यात्रेचे स्वरुप आले होते.
वारकरी वर्गामध्ये आषाढी एकादशीचे महात्म्य असल्याने रविवारी विठ्ठल भक्तीचा महापूर जिल्ह्यात पहायला मिळाला. सर्वच विठ्ठल मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. काही मंदिरांमध्ये अलंकारिक तर काही मंदिरांमध्ये षोडशोपचार पुजा बांधण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर करहरसह गावोगावच्या विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील विठ्ठल मंदिर, गवई विठ्ठल मंदिर, कमानी हौद येथील नवीन विठ्ठल मंदिर, शाहूपुरी येथील विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांची वर्दळ सुरुच होती. दरम्यान, शनिवारी पेठेतील श्री गवई विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची षोडशोपचार महापूजा करण्यात आली. आकर्षक फुलांनी सजवलेल्या गाभार्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीला अलंकार युक्त पोशाख घालण्यात आले होते. अनेक मंदिरांमध्ये अभिषेक, भजन, किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहिली. विठ्ठल पुजेत तुळशीपत्राला विशेष महत्व असल्याने मंदिर परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुळशीपत्र व पुजा साहित्याची खरेदी-विक्री झाली. मंदिर परिसरांना यात्रांचे स्वरुप आले होते.
काही सामाजिक संस्था व संघटनांनी मरंदिर परिसरांमध्ये आषाढीनिमित्त आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आदि विधायक उपक्रमांचे आयोजन केले होते. काही सामाजिक संघटनांनी मंदिर परिसरांमध्ये येणार्या भाविकांना फळे तसेच उपासाच्या पदार्थांचे वाटप केले.