pudhari photo
सातारा

Satara: हिंसक महिला करते अचानक हल्ला

उंब्रजमधील घटनेने खळबळ; महिलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

उंब्रज : उंब्रज तालुका कराड येथे गेल्या काही दिवसांपासून एका महिलेच्या सततच्या हिंसक वर्तनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस प्रशासनाने महिला व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

उंब्रज येथे गेल्या काही दिवसांपासून एका महिलेने हिंसक वृत्तीचा कहरच केला आहे. खांद्यावर पोते घेऊन प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी उंब्रज बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच कॉलेज मार्गासह विविध ठिकाणी भल्या पहाटेपासून दिवसभर फिरताना दिसते. या दरम्यान ती अचानक समोर येणाऱ्या नागरिकांवर कधी पाठीमागून तर कधी समोरून काठीने मारणे, तर कधी हातात असलेल्या वस्तूने अगदी धारदार शस्त्रानेही हल्ला करण्याचे प्रकार तिच्याकडून घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तसेच विशेषतः बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चार दिवसांपूर्वी उंब्रज येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. आईसोबत घरी जात असलेल्या एका 15 वर्षीच्या मुलीला या महिलेने अचानक हातावर चाकू हल्ला केला. या घटनेत मुलीच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलगी व तिची आई सदरच्या प्रकाराने प्रचंड घाबरली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व भीती वाढली आहे. सदरची घटना उंब्रज पोलिसांना समजताच त्यांनी सदर महिलेची पोलिस ठाण्यात रवानगी करून तिला समज देऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केले असल्याचे समजते.

दरम्यान, कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी. तसेच अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे, अशीही मागणी महिला व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT