रेठरे बुद्रुक : उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणी टंचाईची समस्या अशा दुहेरी संकटात जुळेवाडी ता.कराड येथील ग्रामस्थ सापडले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना वापराच्या पाण्याचीही समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात पाण्याची मागणी करत ठिय्या मांडला.
गावची लोकसंख्या अठराशेच्या दरम्यान असून कृष्णानदीतून पाण्याचा उपसा करून गावच्या विहिरीमध्ये सोडण्यात येत आहे. तेथून ते पाणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे पुरवले जात आहे. काही दिवसापासून दिवसा आड पाणी सोडण्यात येत आहे. वास्तविक मोटारींचे विद्युत बिल ज्यादा येत असल्याने पाणीही एक दिवस आड देण्याचे धोरण ग्रामपंचायतीने राबविल्याचे समजते. लाखो रूपयांचे वीज बिलही थकल्याचे समोर येत आहे. सध्या विहिरीतील पाणी उपसा करणारी विद्युत मोटार नादुरुस्त झाल्याने पाणी उपसा करता येत नाही. मोटार अद्याप दुरूस्त न झाल्याने पाण्याची आणीबाणी सुरू झाली आहे. उन्हाच्या झळा वाढत असताना पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
पाणी नसल्याने घरातील लहान मुले,वयोवृद्ध लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तीन दिवसांपासून पाण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामविकास अधिकारी सौ. शुभांगी थोरात यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीमध्ये वारंवार बिघड होत असून ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून सहकार्य करावे.- सौ. शुभांगी थोरात ग्रामविकास अधिकारी