Burglary Pudhari
सातारा

Satara Crime : विलासपूरमध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुढारी वृत्तसेवा

कोडोली : सातारा शहरालगतच्या विलासपूर येथील सहजीवन सोसायटी परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन चोरट्यांचा प्रयत्न जागृत नागरिकांमुळे फसला. दत्त मंदिर परिसरातील अपार्टमेंटमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नातील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे विलासपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीची पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सहजीवन सोसायटी परिसरात शनिवारी मध्यरात्री तीन चोरटे मोटारसायकलवरुन आले. दत्त मंदिर परिसरातील अंधारात त्यांनी दुचाकी उभी केली आणि जवळच असलेल्या अपार्टमेंटकडे पायी चालत गेले. एका फ्लॅटमध्ये दिवा सुरू असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी लगतच्या अपार्टमेंटकडे मोर्चा वळवला. याचवेळी परिसरातील कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून अपार्टमेंटमधील काही नागरिक जागे झाले. नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न सोडून दिला आणि दुचाकीवरून महामार्गाच्या दिशेने पलायन केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. .

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या हालचालींची माहिती मिळण्यास मदत होण्याची शक्यता आहे. परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विलासपूर आणि सहजीवन सोसायटी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT