सातारा

Satara News : वासोटा किल्ला १५ ऑक्टोबरपासून होणार खुला

नियमांचे पालन करण्याचे उपसंचालकांचे आवाहन : पर्यटकांना पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : महाराष्ट्रासह देशभरातील ट्रेकर्स आणि पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या व्याघ्रगड वासोटा किल्ल्याचे पर्यटन १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे वासोटा पर्यटन बहरणार आहे. दरम्यान, पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी केले आहे.

वनपरिक्षेत्र कार्यालय, बामणोली येथील सभागृहात पर्यटनाशी संबंधित बोट क्लब चालक, स्थानिक ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसह पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपसंचालक जगताप यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. बोटीमध्ये १२ ते १५ प्रवासी असणे बंधनकारक राहील. जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा कोयना जलाशयात टाकू नये, याबाबत बोट चालकांनी जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक बोटीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक असून, बोटीतील प्रत्येक पर्यटकाला लाइफ जॅकेट देणे बंधनकारक राहील. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

वासोटा किल्ला पर्यटनाशी संबंधित बोट क्लब चालक, हॉटेल व टेंट व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) बामणोली बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, वनपाल संदीप पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष जाधव, बामणोली बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, शेंबडी बोट क्लबचे उपाध्यक्ष पांडुरंग साळुंखे, मुनावळे बोट क्लबचे अध्यक्ष दिनकर भोसले, किसन शेठ भोसले यांच्यासह बोट चालक, हॉटेल व टेंट व्यावसायिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT