वासोळे येथे कण्हेरचा कालवा फुटला  
सातारा

Satara News : वासोळे येथे कण्हेरचा कालवा फुटला

शेतीचे मोठे नुकसान : माती वाहून गेली; विहिरी गाळाने भरल्या

पुढारी वृत्तसेवा

शिवथर : वासोळे, ता. सातारा गावानजीक असणारा कण्हेर डाव्या कालव्याला सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास भगदाड पडले. त्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले असून शेतीचेही अतोनात नुकसान झाले. शेतातील माती वाहून गेली असून लगतच्या विहिरीही गाळाने भरल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्रीच तातडीने कालव्यातील पाणी बंद केले. त्यामुळे होणारे आणखी नुकसान टळले.

वासोळे गावानजीक कण्हेर डाव्या कालव्यातून गेले अनेक दिवस पाणी लिकेज होत होते. गेल्या महिन्यापासून या ठिकाणी गळतीचे प्रमाण आणखी वाढले होते. ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कालव्यानजीक असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असून कालवा फुटण्याचा धोका व्यक्त केला होता. संबंधित पाणी गळतीचे व्हिडिओ व फोटोही काढून पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दाखवले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाणी गळती होत असलेल्या ठिकाणाची पाहणीही केली होती. परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना झाली नव्हती. रविवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास अखेर हा कालवा फुटला. कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे काही वेळातच भगदाड मोठे होत गेले. त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी शेतामध्ये घुसले. सातारा - लोणंद रस्त्या नजीकच हा कालवा फुटल्याने रात्रीच्या वेळी त्याचा त्रास अनेक ग्रामस्थ व वाहनचालकांना झाला. पाण्याचा फुगवटा सातारा-लोणंद रस्त्यापर्यंत पोहोचला होता. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. लगतच्या मंगल कार्यालयातही पाणी घुसले होते. त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांच्याही घरांमध्ये पाणी घुसले. त्यामध्ये संसारोपयोगी साहित्यही भिजले. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे लोकांना रात्र जागूनच काढावी लागली. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्येही पाणी घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले. काही शेतातील संपूर्ण माती वाहून गेली तर काही शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचून शेतीचे नुकसान झाले. शेतीच्या जवळ असणाऱ्या विहिरींमध्येही पाणी घुसून विहिरीमध्ये माती जावून या विहिरी गाळाने भरल्या. वाढे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये गहू, ज्वारीचे व उसाचे मोठे नुकसान झाले आहे.

पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता प्रगती यादव व उपविभागीय अभियंता अमित तपासे यांनी महसूल विभागाशी संपर्क साधला असून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT