वेणेगाव : सातारा तालुक्यातील निसराळे येथील उरमोडी नदीपात्र ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच कोरडे पडल्याचे चित्र दिसत आहे. नदीपात्रात काही ठिकाणी पाण्याचे डोह शिल्लक राहिले असून, मोठ्या प्रमाणात पात्र उघडे पडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने ओढ दिल्याने घेवडा, सोयाबीन, भुईमूग यांसह विविध खरीप पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत.
यंदा पावसाळा सुरू होऊनही अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने उरमोडी नदीला अद्याप म्हणावा तसा पाण्याचा प्रवाह आलेला नाही. नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या शेतीसह परिसरातील अन्य शेतजमिनींनाही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
निसराळेसह वेणेगाव, कोपर्डे, खोडद, रामकृष्णनगर, काशीळ, अतीत, नागठाणे, माजगाव, तुकाईवाडी, सायळी (पुनर्वसित), जावळवाडी, लिंबाचीवाडी, नांदगाव, देशमुखनगर, टिटवेवाडी, धोंडेवाडी, निगडी वंदन, कामेरी, आंबेवाडी, खोजेवाडी, अपशिंगे, मि., वर्णे, अंगापूर, कालगाव, दुर्गळवाडी आदी गावांमध्ये पावसाअभावी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भिती
पावसाने आणखी काही दिवस अशीच ओढ दिल्यास खरीप पिकांचे तसेच ऊस, तरकारी टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर (फुलकोबी) या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. पिके वाचविण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा असून, उरमोडी नदीपात्रातील पाणीप्रवाह सुरू होणे अत्यावश्यक बनले आहे. आगामी काळात शेतीसाठी पाण्याचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.