lightning strike File Photo
सातारा

Satara lightning strike: मोर्वे, आसलेत विजेचे थैमान; 25 मेंढ्या ठार

मेंढपाळ जखमी ; अवकाळीचा थयथयाट : सातारा, फलटण, कोरेगाव, वाईला तडाखा

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा/भुईंज : सातारा जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थयथयाट केला. मोर्वे, ता. खंडाळा व आसले, ता. वाई येथे वीज पडून 25 मेंढ्या ठार झाल्या. यामध्ये मेंढपाळ नंदकुमार पिसाळ हे जखमी झाले आहेत. सातारा, फलटण, वाई, जावली व कोरेगाव तालुक्यालाही तडाखा बसल्याने पिकांचे नुकसान झाले. पावसाचे अनेक ठिकाणी तांडव झाले असून शेतकरी धास्तावला आहे.

वाई तालुक्यातील आसले गावच्या हद्दीत पांडवनगर येथे सोमवारी दुपारी अचानक वीज कोसळून 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे जखमी झाले. नंदकुमार पिसाळ हे मेंढ्यांना शेतात चरायला गेले होते. शेतात चरत असतानाच दुपारी या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली. वीज कोसळल्याने पिसाळ यांच्या 16 मेंढया जाग्यावरच मृत्यूमुखी पडल्या. तर पिसाळ हे जखमी झाले.

खंडाळा तालुक्यात सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या दरम्यान मोर्वे गावाजवळील सोलाडी शिवारात शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळून 9 शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत अमोल धायगुडे यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

तालुक्यात खंडाळ्यासह पारगाव, अजनूज, कर्नवडी, कण्हेरी, लोहोम, जवळे, शिरवळ, भोळी, शिवाजीनगर, भादवडे, मोर्वे आदी भागांत पावसाने हजेरी लावली. भोळी परिसरात काही ठिकाणी गारपीटही झाली. मोर्वे येथील सोलाडी शिवारात अमोल धायगुडे हे शेळ्यांचा कळप चारत असताना सायंकाळी अचानक पावसास सुरुवात झाली. त्याच वेळी वीज कोसळून कळपातील 9 शेळ्या ठार झाल्या. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच होत्या.

याचबरोबर सातारा, फलटण व कोरेगाव तालुक्यातही पावसाने जोरदार बॅटींग केली. यामुळे फलटणमध्ये फळबागांचे नुकसान झाले. मोहर लागलेला आंबा गळाल्याने शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. तर कोरेगावमध्ये कडबा आणि काढलेली पिके भिजली. सातारा शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT