Shivaji Maharaj statue Satara: शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्यात भूगर्भ चाचणी Pudhari
सातारा

Shivaji Maharaj statue Satara: शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्यात भूगर्भ चाचणी

शिवेंद्रराजेंच्या शिवतीर्थ पाहणीनंतर कामास गती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील पोवईनाका शिवतीर्थ येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळा कामाची तांत्रिक पातळीवर सुरुवात झाली आहे. पुतळ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या चौथरा पायाभरणीसाठी जिओ टेक्निकल ॲनालिसिसच्या सहाय्याने आवश्यक भूगर्भ चाचणी (ट्रायल फिट) करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल लवकरच तज्ज्ञांकडून सादर करण्यात येणार आहे. आठ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या शिवतीर्थ पाहणीनंतर कामाने गती घेतली आहे.

जिओ टेक्निकल ॲनालिसिसच्या सहाय्याने जमिनीखालील माती, दगड तसेच पाणीपातळी आदींची तपासणी मशिनच्या साहाय्याने करण्यात आली. जमिनीची वहन क्षमता, घनता, मजबुती आणि पयाभरणीसाठी आवश्यक असलेली खोली निश्चित करण्यासाठी विविध ठिकाणी नमुने घेण्यात आले. उंच आणि वजनदार पुतळ्यासाठी मजबूत पाया आवश्यक असल्याने कोणत्या प्रकारचा पाया करायचा, याबाबत तज्ज्ञ अभियंत्यांकडून सविस्तर अहवाल तयार करून तो सातारा पालिकेला सादर करण्यात येणार आहे.

शिवतीर्थ परिसराच्या चारही बाजूंनी ही तपासणी करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया चालणार आहे. जमिनीच्या भौगोलिक रचनेनुसार पायाभरणीचा आराखडा अंतिम करण्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्यात येणार आहे. शिवतीर्थ येथील शिवरायांच्या स्मारकाबाबत सातारकांच्या भावना अतिशय जिव्हाळ्याच्या आहेत. त्यामुळे या पुतळा उभारणीच्यादृष्टीने हे अनोखे वास्तूशिल्प ठरणार आहेतच, पण त्याशिवाय ऐतिहासिक अभिमानाचे प्रतीकही मानले जाणार आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा हा पुतळा उभारण्यासाठी सातारा पालिका प्रशासन आणि तज्ज्ञांकडून आवश्यक काळजी घेण्यात येत आहे.

भूगर्भ चाचणीच्या अहवालानंतर पुतळ्याच्या चौथरा बांधकामाला प्रत्यक्ष वेग येणार आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आठ दिवसांपूर्वी शिवतीर्थ परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर या कामाने गती घेतली आहे. शिवरायांच्या भव्य दिव्य पुतळ्यामुळे शिवतीर्थ परिसराला ऐतिहासिक वैभवाची नवी ओळख मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT