कराड : घरासमोरील मोकळ्या जागेच्या वादातून आईला मारहाण होत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतणीच्या डोक्यात व मानेवर लोखंडी पहारीने प्राणघातक वार केल्याप्रकरणी चुलत्याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. या हल्ल्यात चुलतीनेही मुलीच्या आईला दगड मारून जखमी केले होते. याप्रकरणी चुलतीलाही एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.सी.शिंदे यांनी हा निकाल दिला.
याबाबतची माहिती अशी की, पाटण तालुक्यातील चोपदारवाडी (गव्हाणवाडी) येथे १३ डिसेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी कमल यादवराव जाधव आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच त्यांचे दीर सुभाष विठ्ठल जाधव यांचे घर शेजारी आहे. घरासमोरील मोकळ्या जागेच्या हद्दीवरून दोन्ही कुटुंबांत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी कमल जाधव या पतीसमवेत भाजीपाला विक्रीसाठी नाडे नवारस्ता येथील आठवडा बाजारात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी अश्विनी जाधव घरी एकटीच होती. सुभाष जाधव घरासमोरील अंगणाच्या हद्दीवरील दगड काढत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आई-वडील घरी आल्यानंतर दगड काढावेत, असे तिने सांगितल्याचा राग मनात धरून सुभाष जाधव आणि त्यांची पत्नी आक्काताई जाधव यांनी अश्विनीला शिवीगाळ करून धमकी दिली.
या प्रकाराची माहिती अश्विनीने फोनवरून आईला दिली. कमल जाधव घरी आल्यानंतर त्यांनी आरोपींना मुलीला शिवीगाळ करण्याचे कारण विचारले. त्यावरून वाद वाढला. आक्काताई जाधव यांनी कमल यांना पकडून खाली पाडत मारहाण सुरू केली. आईला सोडवण्यासाठी अश्विनी पुढे आली असता सुभाष जाधव यांनी प्रथम तिला हाताने मारहाण केली. त्यानंतर घरातून लोखंडी पहार आणून अश्विनीच्या डोक्यात व मानेवर वार केले. मुलीच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून कमल यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आक्काताई यांनी हातातील दगड त्यांच्या कपाळावर मारून त्यांनाही जखमी केले.
या घटनेप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात सुभाष विठ्ठल जाधव व आक्काताई सुभाष जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पी. एन. मोकाशी आणि एस. एस. महाडिक यांनी तपास करून कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. सहायक जिल्हा सरकारी वकील ॲड. मिलिंद व्ही. कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुभाष विठ्ठल जाधव याला दहा वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर आरोपी आक्काताई सुभाष जाधव हिला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
दोन्ही आरोपींकडून वसूल होणारी दंडाची रक्कम साक्षीदार क्रमांक सहा अश्विनी जाधव हिला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या खटल्यात पैरवी अधिकारी मच्छींद्र जाधव यांनी सहकार्य केले.