सातारा : राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला कायम स्वरुपी बाजार पेठ मिळावी यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. सातारा येथील पोवई नाक्यावरही उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद केली असून या मॉलमध्ये बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री होईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर विभागस्तरीय सरस मानिनी जत्रेचे आयोजन दि. 7 ते 13 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ना. गोरे बोलत होते. यावेळी अपर आयुक्त प्रांजल शिंदे, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिला लखपती झाल्या पाहिजेत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. बचत गटातील महिला लखपती झाली पाहिजे यासाठी राज्य शासन अर्थ सहाय्य करत आहे. महिलांनी उमेदच्या माध्यमातून स्वत:चे व्यवसाय करुन सक्षम झाले पाहिजे. बचत गटांनी बाजार पेठेत कोणत्या मालाला मागणी आहे याचा अभ्यास करुन तो माल उत्पादीत केला पाहिजे. हा माल दर्जेदार असण्याबरोबर पॅकेजींगसह ब्रॅन्डींग केला पाहिजे.
सातारा जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला कायम स्वरुपी बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सातारा येथील पोवई नाक्यावरील उमेद मॉलचे काम दोन महिन्यात सुरु करावे. हे काम गतीने करुन राज्यातील पहिला मॉल सातारा येथे उभा राहील यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, बचत गटातील महिलांना सक्षमीकरण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा येथे विभागस्तरीय सरसचे 7 ते 13 मार्च कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सरसमध्ये विविध जिल्ह्यांचे स्टॉल असून सातारा जिल्हावासियांनी विविध स्टॉलला भेट देऊन वस्तुंची खरेदी करावी, असे आवानही त्यांनी केले.
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी प्रास्तविक केले. यावेळी बचत गटातील महिला उपस्थित होत्या. तसेच विविध स्टॉलवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.