उंबरीवाडी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; खुनाचा आरोप 
सातारा

Satara : उंबरीवाडी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; खुनाचा आरोप

पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : उंबरीवाडी (ता. जावली) येथे एकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारुती श्रीरंग जाधव (वय 48, रा. उंबरीवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी मारुती जाधव यांचे गावातील काही मित्रांसोबत भांडण झाले होते. त्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. जबर मारहाण झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस हवालदार भिसे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदन केले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर मारुती यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे सांगता येईल असे पोलिसांनी सांगितले. मात्र अद्याप अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नसून पोलिस तपासात दिरंगाई करत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मारुती यांचा भाऊ लक्ष्मण श्रीरंग जाधव यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गतवर्षी मारुती यांच्यावर अस्वलाने हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले होते. त्यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय बामणोली यांच्याकडून 2 लाख 38 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. त्यांनी बामणोली येथील बँक ऑफ बडोदा या शाखेत तो जमा केला होता. मारुती हे जास्त शिकलेले नसल्याने त्यांन व्यवहार ज्ञान जास्त कळत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सोबत गावातील काही मित्र पैसे काढण्यासाठी जात होेते व त्यातील बरीचशी रक्कम ही मित्रांनीच हडप केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जे मित्र त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी वारंवार बँकेत जात होते त्यांनीच पैशाच्या वादातून मारुती यांना मारहाण केली व त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT