Cyber Fraud Pudhari
सातारा

Satara Cyber Fraud: उंब्रजमधील स्टेट बँकेच्या खातेदारावर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल

राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म (एनसीआरपी) व महाराष्ट्र सायबरच्या माहितीच्या विश्लेषणातून गुन्हा उघड

पुढारी वृत्तसेवा

उंब्रज : राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म (एनसीआरपी) व महाराष्ट्र सायबरच्या माहितीच्या विश्लेषणातून सायबर फसवणुकीतील रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उंब्रज शाखेतून एका खातेदारांने चेकद्वारे काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बँक खात्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार संदीप जगन्नाथ पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मवर (एनसीआरपी) देशभरातील सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदविल्या जातात. या पोर्टलवर फसवणुकीची रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा झाली, ती होल्ड झाली किंवा चेकद्वारे काढण्यात आली याची माहिती उपलब्ध होते.

महाराष्ट्र सायबर, मुंबई यांनी 1 जुलै 2026 रोजी नाशिक ग्रामीण सायबरला फसवणुकीची रक्कम चेकद्वारे काढल्याबाबतचा डेटा कायदेशीर कारवाईसाठी उपलब्ध करून दिला होता. त्याचे विश्लेषण करताना सातारा सायबर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील उंब्रज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एका खात्यातून फसवणूकीची रक्कम चेकद्वारे रोख स्वरूपात काढण्यात आल्याचे निदर्शनास आले.

प्राथमिक तपासात या बँक खात्याविरोधात एनसीआरपी पोर्टलवर उत्तर प्रदेशातील पीलीभीत आणि तेलंगणा राज्यातील सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनुक्रमे रुपये 3 लाख 30 हजार आणि रुपये 5 लाख असा सुमारे 8 लाख 30 हजार रुपयांच्या व्यवहारांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार टोळ्या देशभरातील विविध बँक खात्यांचा वापर करून फसवणुकीची रक्कम स्वीकारतात. त्यानंतर खाते धारकांकडून ती रक्कम एटीएम किंवा चेक द्वारे काढून ठराविक कमिशन घेऊन मुख्य सूत्रधारांकडे पोहोचवली जात असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून संबंधित बँकेतील खातेदार कोण आहे व या खात्यावरील झालेले व्यवहार शोध घेण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT