घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले Pudhari
सातारा

Umbraj Robbery | उंब्रजमध्ये भरदिवसा धाडसी चोरी : दुचाकीवरील २५ लाखांची सोने चांदीची बॅग लंपास

उंब्रज येथे चोरे रोड मार्गावर घटना

पुढारी वृत्तसेवा

Daylight Theft Umbraj

उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील चोरे रोड मार्गावरील ‘श्री वागदेवी ज्वेलर्स’ चे मालक गणेश यादव चोरेकर यांची मोटरसायकलला असलेली सोने, चांदी व रोख रक्कमेने भरलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सदर बॅगेत सुमारे पंचवीस लाख रुपयांचा ऐवज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि. २३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उंब्रज येथे चोरे रोड मार्गावर गणेश यादव चोरेकर यांचे श्री वागदेवी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता. त्यांनी रोख रक्कम व सोने, चांदीने भरलेली बॅग गाडीवर ठेवून दुकानचे कुलूप उघडण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने मोटारसायकलवर ठेवलेली सोने चांदीची बॉग घेऊन पोबारा केला.

ही घटना काही अंतरावर असलेल्या एका महिलेने पाहून आरडाओरड केली असता, आपली सोने चांदी असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याचे लक्षात येताच त्यांनी मोटरसायकलचा पाठलाग केला. मात्र, मोटारसायकलस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. सदर बॅगेत सुमारे सात तोळे सोने, पाच किलो चांदी आणि दोन लाख रुपये रोख असा सुमारे पंचवीस लाख रुपयांचा ऐवज होता.

घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक ठाणेकर हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसानी मोटरसायकल स्वार याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटरसायकलस्वार मिळून आला नाही.

यावेळी पोलिसांनी तातडीने नजीकचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही कॅमेराच्या अनुषंगाने उंब्रज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती उंब्रज पोलिसांनी दिली.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज येथील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, शिवडे फाटा, टोलनाका, मसूर सह विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा व अन्य मार्गाने तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT