सातारा : विजयादशमी दसर्याच्या मंगलमय वातावरणात सातार्यात शुक्रवारी राजघराण्याची परंपरा व आपुलकीचे दर्शन घडले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘सुरूची’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत दोन्ही राजेंनी एकमेकांना आपट्याची पाने देऊन ‘सोने लुटले’ व पारंपरिक सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला.
दसरा हा पराक्रम, ऐक्य व मंगलतेचे प्रतीक मानला जातो. या परंपरेला सातार्यातील राजघराण्याने नेहमीच जपले आहे. त्याच धर्तीवर यंदाही खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट झाली. याप्रसंगी उपस्थितांना दोन्ही राजेंमध्ये दिसलेली आत्मीयता आणि एकोपा भावला. सातार्याच्या राजकीय वातावरणात दोन्ही राजांच्या या भेटीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही नेत्यांनी परस्परांना शुभेच्छा दिल्याने कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमोल्लंघनाच्या निमित्ताने झालेल्या या पारंपरिक सोने लुटण्याच्या सोहळ्याने राजघराण्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा पुन्हा एकदा उजळून निघाली.
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने देण्याला ‘सोने लुटणे’ असे मानले जाते. ही प्रथा ऐक्य, सौहार्द व संपन्नतेचा संदेश देणारी आहे. याप्रसंगी दिलेल्या शुभेच्छांमधून सातार्यातील जनतेला एकात्मतेचा भावनिक संदेश मिळाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. दसर्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजांच्या झालेल्या या भेटीने सातार्यातील राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.