Udayanraje Bhosale Pudhari File Photo
सातारा

Udayanraje Bhosale: किंग इज बॅक; खा. उदयनराजेंचे जोरदार कमबॅक

मंत्री फडणवीस-गडकरींच्या कार्यक्रमांत सहभाग : समर्थकांसह चाहते सुखावले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गेल्या काही महिन्यांत आजारपणामुळे राजकीय व सार्वजनिक जीवनापासून काहीकाळ अलिप्त राहिलेले सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी एकाच दिवसात दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत जोरदार कमबॅक केले. त्यांनी शुक्रवारी सकाळी साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली. तर दुपारी भुईंज येथे केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या ते मंचावर दिसले. तरतरीत व उत्साही उदयनराजेंची ही भिरकीट पाहून त्यांचे असंख्य चाहते व समर्थक सुखावले. उदयनराजेंच्या एन्ट्रीने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले.

काही महिन्यांपासून खा. उदयनराजे भोसले हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अलिप्त होते. मध्यंतरी ते रुबी हॉस्पिटटला ॲडमिट असताना त्यांच्या प्रकृतीविषयी राज्यभरातील जनतेने प्रार्थनाही केल्या होत्या. त्यानंतर आधी पुण्यात व आता जलमंदिर येथे विश्रांती घेत ते आपल्या प्रकृतीची काळजी घेताना दिसत होते. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील अनुपस्थितीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये व उदयनराजेप्रेमींमध्ये एक प्रकारचा निरुत्साह व मरगळ होती. मात्र शुक्रवारी उदयनराजे एकाच दिवसात दोन महत्त्वाच्या व्यासपीठांवर दिसले आणि साताऱ्याच्या राजकारणात एकच उत्साहाची लाट पसरल्याचे पाहायला मिळाले.

साताऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पाच लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. प्रदीर्घ काळानंतर सार्वजनिक व्यासपीठावर दिसलेल्या उदयनराजेंना पाहून उपस्थित कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीने दोन्ही नेत्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर व्यासपीठावर चर्चाही झाली.

तत्पूर्वी सातारा नगरपालिकेजवळ झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा अनावरणालाही उदयनराजे उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर खा. उदयनराजेंनी थेट भुईंज येथे जाऊन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते मकरंदआबा पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उदयनराजेंच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याच व्यासपीठावर उदयनराजे व गडकरी या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय जाणकार चर्चा करु लागले आहेत.

एकाच दिवसात मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट घेणाऱ्या उदयनराजेंची तरतरी व उत्साह पाहून सातारा जिल्ह्यातील त्यांचे समर्थक व कार्यकर्ते कमालीचे सुखावले आहेत. आजारपणातून सावरलेले उदयराजे पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या धडाकेबाज शैलीत मैदानात उतरण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. साताऱ्याच्या राजकारणात खा. उदयनराजेंचे पुनरागमन म्हणजे नव्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. आगामी काळात उदयनराजे साताऱ्याच्या राजकारणात कोणती भूमिका बजावतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT