पाचगणी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचगणी परिसरात बुधवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पाचगणीकडून वाईकडे कारने जात असताना शहरात एका ठिकाणी अचानक कारवर दोन झाडे व विद्युत तारा कोसळल्या. यामध्ये सुदैवाने तरूण बचावला असून या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, यानंतर शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही घटना पाचगणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर घडली. मुसळधार पावसामुळे झाडांची मुळे कमकुवत झाल्याने अचानक वडाचे आणि आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी नितीन बेलोशे यांची एमएच-११ बीव्ही ५९२५ क्रमांकाची वॅगनआर कार तेथून जात होती. झाडाचा काही भाग गाडीच्या समोरील बोनेटवर तर काही भाग मागील बाजूस पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.
घटनेचा अंदाज येताच बेलोशे यांनी वाहन मागे घेतले. त्यामुळे जीवितहानी टळली. याचवेळी रस्त्यावरून जात असलेला एक दुचाकीस्वारही थोडक्यात बचावला. झाड कोसळताना रस्त्यालगत असलेल्या एका टपरीचेही नुकसान झाले. दरम्यान, झाड रस्त्यावर आडवे पडल्याने पाचगणीतील मुख्य मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अवघ्या काही सेकंदांनी गाडी पुढे गेली असती तर ही घटना जीवघेणी ठरली असती. मुसळधार पावसात मृत्यू समोर उभा ठाकला होता, पण नितीन बेलोशे यांच्यासाठी वेळ अजून आलेली नव्हती. याचाच प्रत्यय आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ झाडाच्या फांद्या व खोड हटवण्याचे काम हाती घेतले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे पावसाळ्यात धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.