खेड : ना आजारपणाची रजा, ना साप्ताहिक सुट्टी: आजारी पडून घरी रहावे लागले तर चूल कशी पेटवायची, लेकरा बाळांना भरवायचं काय, असे एक ना अनेक प्रश्नांचं काहूर डोक्यात असणाऱ्या कचरा वेचक महिला संकटांना अंगाखांद्यावर खेळवतच कचऱ्यातून भाकरीचा चंद्र शोधत आहेत. सकाळी उठल्यापासून त्यांची सुरू असणारी भटकंती आयुष्याच्या शेवटाला गेली असूनही त्या न थकता काम करत आहेत.
सातारा शहर आणि उपनगरातील ग्रामपंचायतींचा रोज सुमारे 80 ते 90 टन कचरा सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत येऊन पडतो. या कचऱ्यातून कचरावेचक महिला पुनर्वापरासाठी योग्य वस्तू गोळा करून भंगारात घालतात, त्यातून मिळणाऱ्या मोजक्या पैशावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या ठिकाणी रोज 15 ते 20 महिला हा रोजगार, खरं तर स्वयंरोजगार करतात. कचऱ्यातून पुठ्ठा, प्लॅस्टिक, काच, थंड पेयाच्या रिकाम्या बाटल्या, लोखंड,आदी वेचून त्या घराचा रस्ता धरतात. वाटेत गोळा केलेले साहित्य भंगार विक्रेत्याला विकतात. त्यातच त्यांचा प्रपंच चालतो. मोळाचा ओढा, प्रतापसिंहनगर, रामनगर,वर्ये, वाढे फाटा, माजगावकर माळ झोपडपट्टी, आदी ठिकाणी राहणाऱ्या या कचरा वेचणाऱ्या महिलांचा कामाचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो.
प्लॅस्टिकची गोणपाट घेऊन या महिला घराबाहेर पडतात. शहरातून कचरा गोळा करून सकाळी पहिली खेप करणाऱ्या घंटागाड्यांमधून त्या सोनगाव कचरा डेपो जातात. खुरपं किंवा लोखंडी सळीच्या साह्याने पडलेला कचरा उचकटून त्यातून पुनर्वापरासाठी योग्य वस्तू त्या गोळा करतात. मेलेली; अर्ध कुजलेली जनावरे, नाकाला झोंबणारी दुर्गंधी, किळसवाणे दृश्य, अंगावर बसणाऱ्या माश्या... कशाची पर्वा न करता कचऱ्यातच संध्याकाळच्या भाकरीचा चंद्र शोधण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे सुरू असते. दुपारी तेथेच कुठेतरी झाडाची सावली पाहून शिदोरीतील भाकरीचे तुकडे त्या मोडतात. चार घास खाल्ले की पुन्हा सुरू झालेला त्यांचा शोध सायंकाळी चार वाजता थांबतो.