उंडाळे: उंडाळे ( ता. कराड) येथे संगम ठाकराची मळी नावाच्या शिवारात नदीतील पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या चरीत सिमेंटच्या पाईप टाकण्यासाठी खुदाई करुन त्या जोडण्यासाठी चरीत उतरलेल्या दोघा मजुरांच्या अंगावर मलमा पडून गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. किरण बाजीराव चव्हाण (वय 30) व अमर रंगराव वडार (वय 30) दोघेही रा. मनव अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळ वरून मिळालेली माहिती अशी की, उंडाळे मनव रस्त्यावरती ठाकराची मळी नावाच्या शिवारात पुलाशेजारी श्रीरंग हरी पाटील यांच्या शेताजवळ असणाऱ्या ओढ्यावरील विहिरीत पाणी सोडण्यासाठी शनिवारी सकाळपासून जेसीबीच्या साह्याने दहा ते बारा फूट चर काढण्याचे काम सुरू होते. ही चर काढून झाल्यानंतर त्यामध्ये सिमेंटच्या पाईप टाकण्यासाठी मनव येथील किरण चव्हाण (वय 29) व अमर उर्फ (सोन्या ) वडार वय 30 यांना सांगण्यात आले होते.
चर काढून झाल्यानंतर जेसीबी ऑपरेटर व त्याच्यासोबत असणारे इतर मंडळी बाजूला झाडाच्या सावलीला जेवण्यासाठी गेले होते. यावेळी किरण आणि अमर यांनाही जेवण झाल्यानंतर थोडावेळ थांबून पाईप टाकूया असे सांगण्यात आले होते. मात्र किरण व अमर यांना इतर दुसऱ्या ठिकाणी काम असल्यामुळे लवकर जायचं असल्याने ते कोणालाही न सांगता काढलेल्या चरीमध्ये सिमेंटच्या पाईप जोडण्यासाठी उतरले. काम सुरू असताना दोघांच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा कोसळला व दोघेही यादी घराच्या खाली अडकले. त्यामध्ये त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला.
बाजूलाच जेवण्यासाठी गेलेल्या जेसीबी ऑपरेटर यांना हे दोघे दिसेना झाल्यानंतर त्यांनी काढलेल्या चरीत पाहिले असता चरीमध्ये मलमा पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना वाचवण्यासाठी कोणताही विलंब न करता मदत कार्य सुरू केले. अत्यंत सावधपणे केलेल्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. दोघांना चरीतून बाहेर काढून तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत असल्याचे घोषित केले. घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी मोठी मोठी गर्दी झाली. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.