लोणंद : वाठार कॉलनी परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरीप्रकरणी लोणंद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन संशयितत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील ४५ किलो कॉपर वायर आणि दुचाकी असा ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोणंद पोलीस ठाण्यातील चार चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वाठार कॉलनी, ता. खंडाळा येथील नीरा उजवा कालवा हद्दीतील डीपी फोडून तांबे चोरीस गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू झाला. पोलिसांनी संशयितांचा माग काढून मर्द रमेश भोसले (वय २४) व शाना मजबुत पवार (वय २३, दोघेही रा. भुरकरवाडी, ता. फलटण) यांना अटक केली. तपासादरम्यान संशयितांनी इतर ठिकाणीही गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
सपोनि शिवाजी जायपात्रे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार विजय पिसाळ, विष्णू धुमाळ, संजय बनकर, हवालदार रत्नसिंह सोनवलकर, महेश टेकवडे, नितीन भोसले, बापूराव मदने, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, काकासो करणे, राहुल राऊत, सागर सुळ, अवधूत धुमाळ, संजय चव्हाण, यशवंत यादव, जमीर मुलानी तसेच होमगार्ड अमोल अमर सुल यांनी केली.