सातारा : साताऱ्यात कधी कुणाचा ‘गेम’ होईल, याचा ‘नेम’ नाही, अशी भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत वाढली असून धाड् धाड् गोळीबार होत आहेत. बिनधोकपणे कोयते नाचवत एकमेकांचा खुलेआम वचपा काढला जात आहे. गुरुवारी भरदिवसा कोयता गँगने वृषभ जाधव याचा निर्घृण खून केल्यानंतर सातारची वाटचाल बिहारच्या दिशेने झाल्याचा प्रत्यय पुन्हा आला. कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरश: सतत मर्डर होत असून त्याला सातारा पोलिसांचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. राजरोसपणे जिल्ह्यात सर्वत्र बंदूक अन् कोयताराज निर्माण झाल्याने सर्वसामान्य दहशतीखाली आहेत. ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलिस कुणाची वाट पाहत आहेत? असा सवाल केला जात आहे.
सातारची शांत, सुसंस्कृत आणि पेन्शनरांचं गाव म्हणून ओळख आहे. मात्र आता सातारा शहर आज अक्षरशः गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव आहे. दररोज घडणाऱ्या खून, मारहाण, कोयता गँगची दहशत, तलवारीने केक कापण्याचे प्रकार, आरडाओरडा व ट्रिपल सीट निघणारी बाईक रॅली, बिनधास्त मिरवणुका आणि डीजेच्या थरथराटामुळे साताऱ्याची शांत व सुसंस्कृत ही ओळख पुसली जात असून सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त झाले आहेत. रात्री-अपरात्री केव्हाही कोणत्याही कारणावरून फटाके फोडून सातारकरांची झोप उडवली जात आहे.
शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे साताऱ्याचा बिहार झाला की काय? असा प्रश्न आता खुलेआम विचारला जात आहे. कायद्याचा व पोलिसांचा गुंडांवर वचक नसल्याने गुन्हेगारांमधील भीती संपत चालली असून, रस्त्यावर कोयते, तलवारी घेऊन फिरणाऱ्या टोळ्यांची दहशत वाढत आहे. एखाद्या वाढदिवसाचा आनंद साजरा करताना तलवारीने केक कापणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रप्रदर्शन करणे, सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल करणे हे प्रकार नित्याने होत आहेत.
सण-उत्सव, जयंती, वाढदिवस किंवा अगदी क्षुल्लक कारणासाठीही शहरात मिरवणुका काढल्या जात आहेत. त्यात बहुतांशी अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून येतो. नियमांची कोणतीही पर्वा न करता रात्री-अपरात्री डीजे लावून गोंगाट केला जातो. यामुळे वृद्ध, आजारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग अक्षरशः हैराण झाले आहेत. मित्राच्या, गल्ली बोळातील नेत्याच्या वाढदिवसासाठी मध्यरात्री बरोब्बर 12 च्या ठोक्याला फटाक्यांचे बार फोडण्याचे फॅड देखील वाढले आहे. कधी आणि कुठे फटाक्यांचे बार फुटतील, याचा नेम नाही. रात्री अपरात्री अचानक होणाऱ्या आवाजांमुळे नागरिक दचकून जागे होतात. अनेकदा या आवाजांमागे गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काय घडतंय, कुठे घडतंय, हे समजायच्या आतच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे.
शहरात कोयता गँगचा सुळसुळाट वाढत चालला आहे. किरकोळ वादातून थेट प्राणघातक हल्ले होत असून, तरुणांच्या हातात शस्त्रं सहज दिसू लागली आहेत. कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये रुजत चालली आहे. अनेक प्रकरणांत गुन्हेगार खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एसपी तुषार दोशी सिंघम व्हा...
साताऱ्याला तुषार दोशी यांच्या रुपाने वशिला नसलेले एसपी लाभले आहेत. त्यांनी मध्यंतरी एन्काँऊटर करुन स्वत:ची सिद्धता केली आहे. मात्र, त्यांना अधिक आक्रमक होण्याची वेळ आली आहे. विशेषत: हाताखालचे पोलिस अधिकारी कमालीचे ढिम्म झाल्याने, एलसीबीत चमकोगिरी वाढल्याने, कारवायांऐवजी शायनिंग होत असल्याने गुन्हेगारांशी घरोब्याचे संबंध ठेवल्यामुळे सातारच्या पोलिस दलाला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. तुषार दोशी यांना डॅशिंग रुप धारण करावे लागणार आहे.
गुंडापुंडांना धरुन चोपाचोपी करावी लागणार आहे. महाविद्यालयांच्या बाहेर टोळक्यांचा सुरु असलेला उच्छाद थांबवावा लागणार आहे. सातारकरांची शांतता भंग करणारे आवाज बंद करावे लागणार आहेत. लोकप्रतिनिधींनी गुंडांची मध्यस्थी केल्यास स्टेशन डायरी ओढून त्यांनाही कायद्याच्या कचाट्यात घ्यावे लागेल. साताऱ्यातली वाढत चाललेली गुन्हेगारी थांबवण्यासाठी एसपी तुषार दोशी सिंघम व्हा, अशी अपेक्षा सर्वसामान्य सातारकरांनी व्यक्त केली आहे.