Satara transport association strike Pudhari
सातारा

Satara transport association strike: साताऱ्यात मालवाहतूक संघटनेचा राज्यव्यापी बंद

राजवाडा ते आरटीओ कार्यालयावर वाहनधारकांची रॅली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्रातील वाहतुकदारांच्या विविध मागण्या व गंभीर अडचणींबाबत सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनच्यावतीने गुरुवारपासून राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. असोसिएशनच्यावतीने राजवाडा ते आरटीओ कार्यालय अशी भव्य वाहनांची रॅली काढण्यात आली. यावेळी असोसिएशनच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना निवेदन देण्यात आले.

जानेवारी 2026 मध्ये केंद्र शासनाने ई चालानसंदर्भात नवीन जाचक नियम जारी केले आहेत ते तात्काळ रद्द करावेत. वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर करण्यात येणारी वसुली तत्काळ बंद करावी. पोलिसांनी महसूल वसुली न करता केवळ वाहतूक नियंत्रण व शिस्त राखण्यापुरते कार्य करावे. परिवहन विभाग व वाहतूक विभागामार्फत करण्यात येणारी वाहनांची ब्लॅकलिस्टिंग पद्धत त्वरित बंद करावी.

न्यायालयात दाखल न केलेली व कालबाह्य झालेली ई चलने पुर्णत: रद्द करावीत. न्यायालयात प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक ती एनओसी द्यावी. चालकांच्या गुन्ह्यांसाठी वाहनमालकाला जबाबदार धरण्याऐवजी चालकाच्या परवान्यावर थेट नोंद करण्याची प्रणाली कार्यान्वीत करावी. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे देण्यात येणारी ई चलने बंद करावीत. नो एंट्री संदर्भातील अव्यवहार्य, अचानक लागू होणारे व वाहतुकदारांना अडचणीत टाकणारे निर्बंध रद्द करुन व्यावहारिक धोरण अवलंबण्यात यावे यासह विविध मागण्यांसंदर्भात संप पुकारण्यात आला आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यावसायिकांनी पोलिस परेंड ग्राऊंड, पोवईनाका, रयत शिक्षण संस्था, शाहू चौक, राजपथ, राजवाडा ते पुन्हा पोवईनाका, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे आरटीओ कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. वाहनांसह आरटीओ कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर असोसिएशनच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यावर दशरथ वाघुले व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठवण्याची ग्वाही दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाहतूक व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनास वेळोवेळी निवेदने दिली. मात्र त्याच्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गुरुवारपासून वाहतूक व्यावसायिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनामुळे होणाऱ्या परिस्थितीस शासन व प्रशासन पूर्णत: जबाबदार राहील.
-प्रकाश गवळी, अध्यक्ष, सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT