सातारा

Satara Traffic Jam: पारगावजवळ वाहतूक कोंडी

नादुरुस्त ट्रकमुळे केसुर्डी फाट्यापर्यंत रांगा, सुमारे चार तास वाहतूक संथगतीने

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव (ता. खंडाळा) परिसरात सेवा रस्त्यावर मालवाहू ट्रक नादुरुस्त झाल्याने शनिवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. पारगाव ते केसुर्डी फाटा दरम्यान सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे चार तास वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

शुक्रवारी रात्री सेवा रस्त्यावर एक मालवाहू ट्रक बंद पडला होता. मात्र, ट्रक बाजूला न घेता त्याचठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून पुणे, मुंबईकडून सातारा, पाचगणी आणि महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली. परिणामी, बंद पडलेल्या ट्रकजवळ वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही वेळातच कोंडी झाली.

उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने तसेच शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने अनेक नागरिक कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे खंबाटकी घाट ते पारगाव परिसरात सकाळी सहा ते दहा या कालावधीत वाहनांची प्रचंड गर्दी झाली. पारगाव येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे.

बंद वाहने तातडीने हटवण्याची मागणी...

खंबाटकी घाट परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत असते. महामार्गावर बंद पडलेली किंवा अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला काढून वाहतुकीतील अडथळे दूर केल्यास कोंडी टाळता येऊ शकते. महामार्ग पोलिसांची नियमित गस्त सुरू असतानाही अशा वाहनांकडे वेळेत लक्ष दिले जात नसल्याची नाराजी वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT