शिखर शिंगणापूर : माण तालुक्यातील वावरहिरे येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात एका ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. रतीलाल लक्ष्मण चौरे (रा. भीमकेत, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. याबाबत ट्रॅक्टरचालकाविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथून काही मजूर ट्रॅक्टरमधून सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील साखर कारखान्याकडे ऊसतोडीसाठी निघाले होते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास वावरहिरे गावच्या हद्दीतील घाट परिसरात पाणलिंग मंदिराजवळील वळणावर चालकाने बेफिकिरीने ट्रॅक्टर चालवल्याने नियंत्रण सुटल्याने तीव्र उतारावर ट्रॅक्टर उलटला. यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेले दोघे ऊसतोड मजूर खाली पडले. यामध्ये रतिलाल लक्ष्मण चौरे (रा. भीमकेत, ता. सटाणा, जि. नाशिक) याचा जागीच मृत्यू झाला, तर भरत काळुराम सोनवणे यासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि भाऊसाहेब गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ऊसतोड मजूर गणपत बाळू माळी यांनी दहिवडी पोलिसांत फिर्याद दिली असून ट्रॅक्टरचालक संजय रामचंद्र मारकड (रा. मारकडवाडी, ता. माळशिरस) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.