Satara Crime : सातार्‍यातील तिघांच्या टोळीवर ‘मोका’ 
सातारा

Satara Crime : सातार्‍यातील तिघांच्या टोळीवर ‘मोका’

संशयित शाहूपुरीतील : एसपी निखिल पिंगळेंचा दणका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहर परिसरात टोळीची दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांकडून आर्थिक व इतर फायदे मिळवण्यासाठी संघटितपणे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला पोलिसांनी दणका दिला. शाहूपुरीतील एका अल्पवयीन मुलासह तिघांवर मोका कायद्यानुसार कारवाई केली. एसपी निखिल पिंगळे यांच्या कारवाईमुळे गुन्‍हेगार हादरुन गेले आहेत.

प्रेम गणेश पवार (वय २२, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे टोळीप्रमुखाचे नाव आहे. प्रेम आबासाहेब अडागळे (२१, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शाहूपुरी, सातारा) व आनंदा ऊर्फ अण्णा लक्ष्मण माने (२१, रा. शाहूपुरी, सातारा) अशी अन्य टोळी सदस्यांची नावे आहेत.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात या टोळीवर अनेक गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. टोळीतील संशयितांवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, मारामारी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करणे, अस गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने दहशत निर्माण करून आर्थिक व अन्य फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी मोका कारवाईसाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावातील कागदपत्रे व गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासल्यानंतर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी संबंधित गुन्ह्यात मोका कायद्याची कलमे वाढवण्यास परवानगी दिली. तपास आता डीवायएसपी विपुल पाटील करणार आहेत.

कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू असेल. नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये द्याव्यात. यानंतरच पोलिस पुढील कारवाई करू शकणार आहेत.
- निखिल पिंगळे, पाेलिस अधीक्षक, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT