उंब्रज : भोळेवाडी (ता. कराड) येथील कुणबावा शिवारात रविवारी सकाळी ऊसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. या अनपेक्षित घटनेने ऊसतोड मजुरांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, प्रसंगावधान राखत नागरिकांनी पिल्लांना सुरक्षितपणे कॅरेटमध्ये ठेवून वनविभागाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
भोळेवाडी येथील हौसेराव जोतिराम सूर्यवंशी यांच्या कुणबावा शिवारातील शेतात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ऊसतोड सुरू होती. यावेळी मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली. वनरक्षक पूजा खंडागळे आणि वनसेवक अमोल महाडिक यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून शेतातील ऊसतोड तातडीने थांबविण्यात आली. बिबट्याची पिल्ले अंदाजे एक महिन्याची असल्याचा अंदाज वनरक्षक पूजा खंडागळे यांनी व्यक्त केला.
पिल्लांना त्यांच्या आईपासून दूर न ठेवता नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे देण्यासाठी वनविभागाने नियोजन केले आहे. यासाठी सायंकाळी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. योग्य दक्षता घेऊन पिल्लांना त्यांच्या आईशी पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी, ऊसतोड मजूर आणि शिवारात काम करणाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनरक्षक पूजा खंडागळे यांनी केले आहे.