दहिवडी : मार्डी व आंधळी परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने दहिवडी पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली. ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल राजेंद्र चव्हाण, अविनाश कुंडलीक चव्हाण व रोहित हणमंत चव्हाण या तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीत संशयितांनी मार्डी येथील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मार्डी येथील राजमाने यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करणे आणि चव्हाण यांच्या घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी, दागिने, गहू, मोटारसायकल आदींसह २ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
दहिवडी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे, पोलिस हवालदार सचिन जगताप, पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, संतोष विरकर, महेश सोनवळकर, सुधीर करचे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.