theft pudhari photo
सातारा

Satara Theft : चोरट्यांचा जनावरांच्या चाऱ्यावर डल्ला! धक्कादाक घटनेमुळे खळबळ

शामगावात टेम्पोतून स्वीट कॉर्न मक्याची चोरी; कष्टाने पिकवलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

कराड : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा संतापजनक प्रकार कराड तालुक्यातील शामगाव येथे उघडकीस आला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी पाण्याचा थेंब आणि हिरव्या वैरणीचे पातेही मोलाचे ठरत असताना चोरट्यांनी थेट शेतातील स्वीट कॉर्न मक्यावरच डल्ला मारला. टेम्पोतून आलेल्या चोरट्यांनी कणसांसह मका चोरून नेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कराड-पुसेसावळी मार्गावरील शामगाव परिसरात हा प्रकार घडला. शेतकरी संजय पोळ यांनी कष्टाने पिकवलेल्या स्वीट कॉर्न मक्याची चोरी झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध करणे, जनावरांसाठी चारा राखून ठेवणे आणि वाढत्या खर्चातून शेती टिकवणे, अशी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यात आता शेतातील पिकेही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

शेतीत पीक उभे करण्यासाठी शेतकरी घाम गाळतो. पाणी, बियाणे, खते आणि मजुरीवर खर्च करतो. मात्र, तयार झालेले पीक चोरट्यांकडून लुटले जात असेल, तर त्याच्या कष्टाचे मोल काय राहणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दुष्काळात मक्याचे पीक हे जनावरांच्या चाऱ्यासाठीही महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत चाऱ्याची चोरी होणे हा केवळ आर्थिक नुकसानीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जगण्यावर घाला घालणारा गंभीर प्रकार आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सखोल तपास व्‍हावा, अशी मागणी होत आहे.

या घटनेमुळे शेतातील पिकांचे संरक्षण कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. संबंधित यंत्रणांनी या चोरीची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जनावरांचा चारा सुद्धा आता सुरक्षित राहिलेला नाही. दुष्काळी परिस्थिती असूनही दुष्काळ जाहीर होत नाही, त्यामुळे अगोदरच अडचणी भरपूर आहेत. त्यामुळे शासनाचे प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
- संजय पोळ, शेतकरी, शामगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT