वडूज : खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत दोन दुकाने आणि दोन घरांना लक्ष्य केले. या घटनांमध्ये ३५ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र, पाच हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल संच चोरीस गेल्याची माहिती आहे. एका स्टेशनरी दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला. सलग दुसऱ्या दिवशी चोरीच्या घटना घडल्याने शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडूज-कराड रस्त्यावरील अभय दोशी यांच्या ‘एस मार्ट’ किराणा दुकानाचे शटर रात्री एकच्या सुमारास उचकटून चोरट्यांनी दुकानातील पाच हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल संच लंपास केला. या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार संशयित चोरटे कैद झाले आहेत. याच परिसरातील एका स्टेशनरी दुकानातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. तेथून काही मुद्देमाल चोरीस गेला आहे का, याची माहिती मिळू शकली नाही.
मुख्य बाजारपेठेलगत राहणाऱ्या वर्षा मारुती लावंड यांच्या बंद घरात प्रवेश करुन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र चोरून नेले. तसेच धान्य बाजार परिसरात राहणाऱ्या भोला या पश्चिम बंगालमधील कामगाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील साहित्याची उलथापालथ केली. या घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, शहरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खमक्या बीट अंमलदारांची गरज!
दोन दिवसांपूर्वी पहाटे तीनच्या सुमारास बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे यांच्या निवासस्थानी सहा ते सात शस्त्रधारी चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वीच्या आठवड्यात कुरोली फाटा येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करण्यात आले होते. तसेच कातरखटाव येथे खून करून मृतदेह वडूज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या आवारात टाकल्याची घटना घडली होती. परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या गस्त आणि तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी तक्रारी कमी नोंदवल्या जाव्यात, असा प्रयत्न होत असल्याची चर्चाही नागरिकांत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बीट अंमलदारांमध्ये बदल करुन वडूज शहरासाठी सक्रिय आणि कर्तव्यदक्ष बीट अंमलदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.