वाई : वाई शहरासह तालुक्यात चोरीच्या विविध घटनांची मालिका सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, विद्युत वितरणाच्या डीपी, दुकाने, मोबाईल, सोन्याचे दागिने अशा विविध प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असताना या गुन्ह्यांचा तपास नेमका किती पुढे गेला? किती आरोपी पकडले आणि चोरीचा किती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, याचा थांगपत्ता लागेना. काही प्रकरणांमध्ये आरोपी सापडले तरी चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळत नसल्याने पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह केले जात आहे.
दिवसाढवळ्या चोरी तरीही आरोपींचा शोध लागत नसल्याचेही चित्र आहे. उच्चभ्रू भागात दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दुकाने फोडणे, मोबाईल चोरी, घरफोडी आणि सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. गुन्हा घडल्यानंतर पंचनामा करणे आणि गुन्हा दाखल करणे ही प्रक्रिया असली तरी त्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचणे, चोरीचा माल शोधणे आणि संपूर्ण साखळी उघड करणे महत्त्वाचे आहे. चोरीचा माल परत मिळाला म्हणजे तपास पूर्ण झाला असे नाही. चोरीमागचा मेंदू आणि संपूर्ण साखळी पकडली गेली पाहिजे अशी अपेक्षा असते.
परंतु, पोलिस त्या प्रकरणाच्या मुळाशी जात नसल्याने केवळ मुद्देमाल हस्तगत झाला म्हणजे काम फत्ते, अशाच अविर्भावात वागत आहेत. केबल अन् मोटार चोरीतून मिळवलेले चोरीचे धातू भंगार बाजारात विकले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भंगार व्यवसायाची पोलिसांनी काटेकोर तपासणी करावी, चोरीचा माल खरेदी-विक्री करणाऱ्या साखळीचा शोध घ्यावा आणि संशयास्पद व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
पश्चिम भागातील एका ग्रामपंचायतीची केबल चोरीला गेल्यानंतर चोरट्यांनी ती जाळून त्यातील तांबे काढल्याचे आणि हे तांबे एका व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी दिल्याचे प्रकरण चर्चेत आले. पोलिसांनी तांबे हस्तगत करून ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे दिल्याची माहिती आहे. मात्र या प्रकरणात चोरी करणारे कोण चोरीचा माल स्वीकारणारा व्यापारी कोण? माल कुठून आला याची माहिती अद्याप समोर आली नाही.
मुद्देमाल हस्तगत झाला; पण आरोपींचा उलगडा का झाला नाही, याची झाडाझडती वरिष्ठांनीच घेणे गरजेचे आहे. चोरीच्या मालाची विल्हेवाट भंगार बाजारातून होत असल्याची शक्यता असेल तर पोलिसांनी या साखळीची चौकशी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान थांबवायचे असेल तर चोर पकडण्याबरोबरच चोरीचा माल खरेदी करणाऱ्या बाजारावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे वरिष्ठांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घ्यावा, तपासाची सद्यस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे.