The leopard came near the house
बिबट्याचा थरार 
सातारा

सातारा : मध्यरात्री दारात येऊन बिबट्याचा थरार

पुढारी वृत्तसेवा

परळी : परळी खोर्‍यात वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून पाळीव प्राणी व जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. कुस बुद्रुक येथे तर बिबट्याने घरासमोरील अंगणात घुसून कुत्र्यावर हल्ला केला. मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने कुटुंबीय जागे झाले. त्यांनी घरातील बरचा उगारून आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने जबड्यातून कुत्र्याची सुटका करत धूम ठोकली.

परळी खोर्‍यात बिबट्याचा वावर वाढला आहे. कुस बु॥ येथे सोमवारी रात्री दोनच्या दरम्यान बिबट्याचा थरार पहायला मिळाला. येथील रत्नदीप लोटेकर यांना त्यांचे पाळीव कुत्रे ओरडत विव्हळत असल्याचे जाणवले. त्यांनी बाहेरचा अंदाज घेत दरवाजा उघडला तर बिबट्या आणि पाळीव कुत्र्याची झटापट सुरू होती. बिबट्याने कुत्र्याच्या मानेला चावा घेतला होता. बिबट्या कुत्र्याला ओढत बाहेर आणत होता. त्याचवेळी रत्नदीप यांनी बरचा उगारत बिबट्याला हुसकावण्यासाठी आरडाओरडा केला. काही वेळ गेल्यावर बिबट्याने कुत्र्याला सोडून जंगलाकडे धूम ठोकली. हा थरार लोटेकर कुटुंबीय पहात होते. वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्याने डोंगरदर्‍यातील कुटुंबीय भेदरले आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व आमची पाळीव जनावरे व आमचे रक्षण करावे, अशी मागणी परळी खोर्‍यातील जनतेकडून होत आहे.

SCROLL FOR NEXT