लोणंद : लोणंद, ता. खंडाळा येथे क्षणिक रागातून भाड्याने राहत असलेल्या एकाने दुसऱ्या साथीदाराचा पट्ट्याने गळा आवळून खून केला. याप्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाला लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश संतोष गायकवाड (वय 22, रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश गायकवाड हा एमआयडीसीत कामाला होता. तो शहरातील माळी आळीतील गोकुळ क्षीरसागर यांच्या इमारतीत भाड्याने राहत होता. त्याच्यासमवेत आणखी दोघे-तिघे राहत होते. मंगळवारी या खोलीत खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांना सोमवारी रात्री गणेश गायकवाडचा कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून झाल्याचे आढळले. याप्रकरणी नामदेव जयसिंग लगट (वय 37, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली.
दरम्यान, शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पोलिसांना संशय आला. त्यानेच गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही. अखेर क्षणिक रागातून खून केल्याचे त्याने कबूल केले.
सपोनि सुशिल भोसले, पीएसआय रोहित हेगडे, हवालदार राम तांबे, राहुल वाघ, नितीन भोसले, सतीश दडस, प्रमोद क्षीरसागर, योगेश कुंभार, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, सचिन कोळेकर, अवधूत धुमाळ, संजय चव्हाण, शेखर शिंगाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.