सातारा : काही दिवसांपासून जिल्ह्यावर अवकाळीचे सावट घोंघावत असतानाचा तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने अवघे जनजीवन होरपळू लागले आहे. उकाडा व घामाच्या धाराने नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी साताऱ्याचे तापमान 41.7 अंशापर्यंत पोहोचले असून थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरही तापू लागल्याने तापमान 33 अंशावर होते. सूर्य आग ओकू लागल्याने सलग तिसऱ्या दिवशी तापमान चाळीशी पार गेले होते.
वाढते ऊन व उष्म्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. उन्हाचा चटका वाढल्याने सकाळी 8 वाजता घामाच्या धारा वाहत आहेत. उन्हामुळे घराबाहेर पडणे अवघड होत असल्याने भर दुपारी रस्ते ओस पडत आहेत. मे महिन्याच्या मध्यावर उन्हाचा चटका अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जीवाची काहिली होत असताना आणखी तापमानवाढीच्या अंदाजाने नागरिक हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळाही वाढू लागल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.