Temperature Pudhari
सातारा

Satara temperature: सातारकर घामाघूम; पारा 41 अंशांवर स्थिर

उष्माघाताचा धोका वाढला; पाणी टंचाई आणखी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साताऱ्याचे तापमान गेले काही दिवस 41 अंश सेल्सिअस स्थिर असल्याने सातारकरांची होरपळ सुरूच आहे. वाढत्या तापमानाने जिल्हावासीय घामाघूम झाले आहेत. तसेच उष्माघाताचा धोका वाढला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी सातारचा कमाल पारा 41 अंश, तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा कमाल पारा 33 अंशांवर होता. दरम्यान, उन्हाच्या चटक्यामुळे टंचाईच्या तीव्रतेत आणखी वाढ झाली आहे.

सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत आहे. दुपारी 11 ते 4 या दरम्यान तापमानाचा पारा 41 अंशांच्यावर जात असल्याने सातारा शहर परिसरातील वर्दळलेल्या मुख्य रस्त्यासह महामार्गावरही शुकशुकाट दिसत आहे. हवेतील आर्द्रता कमी होत असल्याने कोरड्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.

वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांसह लहान मुलांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उष्ण वाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, उष्म्यापासून बचावासाठी सरबत, उसाचा रस, नारळाचे शहाळे, ताक, लस्सी, शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच बागा व उद्यानामध्येही दुपारच्या वेळी नागरिकांची गर्दी होत आहे. नदी, तलाव, विहिरीवर बालगोपाळांसह नागरिक पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT