सातारा

Satara: तासवडे टोलनाका महामार्गावर बेकायदा पार्किंग

हॉटेल व ढाब्यांच्या मनमानीमुळे अपघातांचा धोका वाढला; स्थानिकामध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

तासवडे टोलनाका : शेंद्रे ते कागल सहापदरी महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून या काळात प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच तासवडे टोलनाका परिसरातील हॉटेल, ढाबे व पानटपऱ्यांसमोर महामार्गावरच सुरू असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यालगत असलेल्या हॉटेलसमोर चारचाकी वाहने, ट्रक, टेम्पो राजरोसपणे उभे केले जात असल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रवासी चहा, नाश्ता किंवा जेवणासाठी थांबल्यानंतर आपली वाहने थेट महामार्गावर उभी करतात. विशेष म्हणजे संबंधित हॉटेल चालकही वाहनचालकांना पार्किंगबाबत कोणतीही सूचना करत नसल्याने हा प्रकार अधिकच वाढला आहे. परिणामी अनेक ठिकाणी महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तासवडे टोलनाका परिसरातील अनेक हॉटेल व ढाबे रात्रंदिवस सुरू असतात. त्यामुळे येथे सतत वाहनांची गर्दी असते. महामार्गावरच पार्किंग होत असल्याने स्थानिकांच्या दुचाकी व छोट्या वाहनांचे अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हॉटेल शुक्रतारा समोर महामार्गाच्या एकाच लेनमध्ये दोन्ही बाजूंना मोठे ट्रक उभे करण्यात आले होते. त्या अरुंद जागेतून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT