तासवडे टोलनाका : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाका परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन व धोकादायक पद्धतीने मनमानी पार्किंग करणार्या १ हजार ४५० वाहनांवर तळबीड पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्गावर उंब्रज ते कराड दरम्यान अनेक वाहन चालक महामार्गावरच ट्रक, टेम्पो तसेच इतर वाहने पार्क करतात. धोकादायक पद्धतीने वाहनांचे पार्किग केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. महामार्गावर दिवस रात्र वाहनांचे पार्किग असल्याने प्रवास करणार्या वाहन चालकांसह स्थानिकांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्गावर मनमानीपणे धोकादायक पद्धतीने वाहनांचे पार्किग केले जाऊ नये, यासाठी तळबीड पोलिसांनी वारंवार सूचना दिल्या जात होत्या. मात्र त्यानंतरही या सूचनांसह वाहतूक नियमांकडे अनेक वाहन चालक दुर्लक्ष करत होते.
या पार्श्वभूमीवर तळबीड पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरू असल्याने सोमवारी तळबीड पोलिसांनी विशेष वाहतूक तपासणी मोहिम राबवून संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व त्यांच्या सहकार्यांनी केली.