तरडगाव : लोणंद-फलटण रोडवरील तरडगाव ता. फलटण येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या कार व ट्रॅक्टरच्या अपघातात कारचालक ठार झाला. तर कारमधील पाच प्रवाशी जखमी झाले असून या अपघाताची लोणंद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अक्षय बाळासाहेब नरवडे (वय 29, रा. अक्कलवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे अपघातात ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन जाधव (रा. निंबुत, ता. बारामती) हे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एम एच 11 बीएच 1982) घेवून फलटणकडे निघाले होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या कार (एम एच43 वाय9643) ने पुलाच्या चढावर ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात कार चालक अक्षय नरवडे हे जागीच ठार झाले. गाडीतील अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात कारसह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सपोनि सुशील भोसले यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार येळे करत आहेत.