सातारा : ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा फोटो नर्तिकेसोबत मॉर्फ करून तो सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला. या प्रकाराने सातार्यात संतप्त प्रतिक्रिया उमटून तणाव निर्माण झाला. एकवटलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिस मुख्यालय गाठले. याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतीक थोरात देशभक्त जेन झी, सोनाली देशमुख, हरी शिंदे, माणदेश प्राईम न्यूज यांच्या विरुद्ध ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी तक्रार दिली आहे. फेसबुकवर प्रतीक थोरात या नावावरील पेजवर ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा फोटो वापरून बनावट, कृत्रिमरीत्या फोटो तयार करून प्रसारित केला. संबंधित फोटोसाठी एआय ॲप, डिजिटल एडिटिंग, मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हाच फोटो इतरांनी सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा समाजमाध्यमांवर माॅर्फ केलेला संबंधित फोटो व्हायरल झाला. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. संबंधित फोटोमध्ये दहीहंडी कार्यक्रमात नर्तिका नाचत असून त्याकडे ना. शिवेंद्रराजे पाहत आहेत. या फोटोवर सोशल मीडियावर ‘कॅप्शन सुचवा,’ असे लिहिलेले होते. हा फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हायरल होताच ना. शिवेंद्रराजे हे नेटकऱ्यांकडून ट्रोल होण्यास सुरुवात झाली.
चुकीच्या पद्धतीने फोटो व्हायरल होत असल्याचे समजताच नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, रवी किर्दत, अमर मोकाशी यांच्यासह कार्यकर्ते संतप्त झाले. दुपारी २ वाजता त्यांनी थेट सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर कार्यकर्ते थेट पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना भेटले. यानंतर चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
स्क्रीनशॉट, माफीनामा, झापाझापी...
ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा माॅर्फ केलेला फोटो चुकीच्या पद्धतीनेे व्हायरल होत असल्याने पोलिस ठाण्याकडे समर्थक मोठ्या प्रमाणात आले. ज्यांनी ज्यांनी फोटो व्हायरल केला त्यांचा मोबाईल नंबर शाेधण्यात आला. समर्थकांनी थेट फोन लावून फोटोबाबत जाब विचारताच संबंधितांनी फोनवरून माफीनामा दिला. मात्र, समर्थक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. झापाझापी करत तत्काळ फोटो डिलिट करून सातार्यात येण्यास बजावत होते.
ना. शिवेंद्रराजे यांच्या फोटोबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांना तपासाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तांत्रिक प्रक्रिया असून गुगल, मेटा यांच्याशी संपर्क करून तपासानंतर कारवाई केली जाईल.- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, सातारा