कोडोली : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम झाल्याने राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. परिणामी, अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी सातारा पंचायत समितीच्या माध्यमातून आतापर्यंत तालुक्यात स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने २८७ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या वतीने ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेवर आधारित विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना संसारे म्हणाले, सातारा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पश्चिम भागात वनराई बंधारे बांधणे सोयीचे ठरत आहे. मात्र, सातारा शहरालगतच्या गावांमध्ये तसेच पुनर्वसित गावठाण परिसरात ओढे व नाले उपलब्ध नसल्याने बंधारे उभारण्यात अडचणी येत आहेत.
सातारा तालुक्यात १९७ महसुली गावे असून, तालुक्यात जवळपास २०७ गावे, वाड्या आणि वस्त्या आहेत. चालू वर्षात दुष्काळ निवारणासाठी तसेच जमिनीतील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी ‘गाव तेथे पाच वनराई बंधारे’ उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील आहे. या मोहिमेला गावागावांतील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेही संसारे यांनी सांगितले.
दरम्यान, पंचायत समितीच्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, भूजल पातळी टिकवून ठेवा आणि पाणीटंचाईवर मात करा’ या मोहिमेअंतर्गत आरळे-वडूज येथे उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका कृषी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे, अभिजीत साबळे, संदीप माने, ग्रामपंचायत अधिकारी संजय पालवे, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.