सातारा

Satara News : आंदोलन तीव्र करण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

कोणाला वेठीस नव्‍हे तर शेतकर्‍यांच्‍या घामासाठीच लढाई : शेळके

पुढारी वृत्तसेवा

नागठाणे : उस दरासाठी आमची चर्चेची तयारी आहे; परंतु सरकार चर्चेसाठी पुढे येत नाही. किणी येथे संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ४५०० रुपयांऐवजी ४२०० रुपये दराची मागणी केली असून हा दर शेतकऱ्यांना दिला जावा. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत हे चक्काजाम आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरूच राहील. आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्‍यास हे आंदोलन तीव्र करण्‍याचा इशारा स्‍वाभिमानीचे जिल्‍हाध्‍यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.

आंदोलनस्थळी संघटनेची भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, साखरेचे दर वाढलेले असताना साखर कारखानदारांनी त्याचा योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे. ही लढाई कोणाला वेठीस धरण्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आणि हक्काची लढाई आहे. या आंदोलनाला ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्थानिक शेतकरी उत्स्फूर्तपणे करत आहेत.

कारखानदारांनी एफआरपीपेक्षा चांगला दर तातडीने जाहीर करावा. संघटनेला कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादाचा हव्यास नाही. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा दर जाहीर केला, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतः त्यांच्या दारात जाऊन त्यांचा जाहीर सत्कार करेल. मात्र, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलनातून एक पाऊलही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही नागठाणेत शेतकरी ठाण मांडून असल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग सुरक्षा पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूंची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. मुंबईकडून कोल्हापूरकडे जाणारी तसेच कोल्हापूरकडून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने सातारा-बॉम्बे रेस्टॉरंट- रहिमतपूर-पुसेसावळी-सांगली-अंकली-सांगली फाटा या मार्गाने वळवण्यात आली आहेत.

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT