सातारा : डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित फौजदार गोपाळ बदने व संशयित प्रशांत बनकर या दोघांचा मुक्काम सध्या सातारा कारागृहात आहे. जेलचा अजब खेळ बदने याला पहायला मिळाला. आतापर्यंत आरोपींना पकडून त्याने जेलमध्ये घातले असताना आता स्वत:वरच आरोपींसोबत राहण्याची वेळ त्याच्यावर आली. दरम्यान, दोघा संशयितांना सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
दहा दिवसांपूर्वी डॉ.संपदा मुंडे यांनी फलटण येथील लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांनी तळ हातावर फौजदार बदनेवर गंभीर आरोप करत बलात्कार केल्याचे म्हटले तर दुसरा संशयित प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे. उच्चशिक्षित डॉक्टर युवतीच्या या आरोपामुळे पोलिस दलाची नाचक्की झाली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. इतर पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर यांनी कसा त्रास दिला याबाबतचे जून 2025 पासून डॉ.संपदा मुंडे यांनी केलेले तक्रारअर्जही समोर आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला.
डॉ.संपदा यांच्या मृत्यूनंतर दोन्ही मुख्य संशयित पसार झाले होते. अशातच फलटण येथे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री यांचाच दौरा निश्चित होता. गंभीर घटना घडल्याने व दोन्ही संशयित पसार झाल्याने सातारा पोलिस दलावर ताण आला. पण आश्चर्य मुख्यमंत्री यांचा दौरा होण्याअगोदरच दोन्ही संशयित पोलिस ठाण्यात हजर झाले. यानंतर राजकारण्यांकडून चिखलफेकीला सुरुवात झाली. ती अजूनही सुरुच आहे.डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्याप्रकरणात पहिल्यांदा प्रशांत बनकर व नंतर गोपाळ बदने पोलिस ठाण्यात हजर झाला. दोघांना सुरुवातीला पोलिस कोठडी व पुन्हा हजर केले असता आणखी एकदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोनदा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांची रवानगी सातारा जिल्हा कारागृहात झाली.
जेल पाहून बदने निर्विकार झाला....
सातारा कारागृहाला संपूर्ण सीसीटीव्हीचे जाळे आहे. सर्कल, बरॅक, सेलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच राहत असून कोण काही बोलला तरी त्याचा आवाज रेकॉर्ड होतो. संपूर्ण सीसीटीव्हीचा वॉच राहत असल्याने भले-भले गुन्हेगार वचकून राहतात. दरम्यान, निलंबित फौजदार बदने याला कारागृहाबाहेर आणल्यानंतर तो निर्विकार झाला होता. ज्या जेलात आपण आरोपी धाडले तिथेच आपल्यावर बसण्याची वेळ आल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटली होती.