Gold Theft File Photo
सातारा

Satara Gold Theft: सुरवडीत भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वारांचा पोबारा

सुरवडी आणि परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

साखरवाडी : सुरवडी येथील १५ फाटा परिसरात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोन अज्ञात युवकांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सुरवडी आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरवडी येथील मंगल नंदू जाधव या कालव्यालगत शेळ्या चारत असताना मंगळवारी (दि. २ जून) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास बिना नंबर प्लेटच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि २५ मण्यांची सोन्याची पोत हिसकावून नेली. घटना घडली त्यावेळी त्यांचे पती नंदू जाधव हे देखील जवळच होते. मात्र ते कालव्याच्या खालच्या बाजूस शेळ्यांकडे लक्ष देत असल्याने संशयितांनी संधी साधून दागिने हिसकावले आणि दुचाकीवरून वेगाने पसार झाले.

घटनेनंतर संशयित युवक सुरवडीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सर्व्हिस रस्त्यावरील दोन दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयितांचे चित्रण झाले आहे. मात्र दुचाकीचा वेग अधिक असल्याने आणि अंतर जास्त असल्याने त्यांची स्पष्ट ओळख पटू शकलेली नाही. विशेष म्हणजे नंदू जाधव यांच्या घरासमोरून सुमारे सहा महिन्यांपूर्वी १८ शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असतानाच आता ही घटना घडल्याने जाधव कुटुंबाला पुन्हा फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT