सातारा

Satara Crime: सुरुर येथे पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण गजाआड

भुईंज पोलिसांची मध्यरात्री कारवाई : देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

पुढारी वृत्तसेवा

भुईंज/वेळेः सुरूर, ता. वाई येथील उड्डाण पुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रसाद शुक्राचार्य बागल (वय २४, रा. सुरूर, ता. वाई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह २८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे २.१५ वाजता हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत सुरूर गावच्या हद्दीतील ब्रीजखाली एक व्यक्‍ती संशयास्पदरीत्या उभा असून, त्याच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेतले.

सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सुरूर ब्रीजखाली जाऊन पाहणी केली असता संशयित प्रसाद बागल तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ पिस्तूल जप्त करून संशयिताला अटक केली. या प्रकरणी प्रसाद बागल याच्याविरुद्ध भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परि. पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे, सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. ताटे तसेच पोलिस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलिस शिपाई सोमनाथ बल्लाळ आणि सागर मोहिते यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT